बंद

    परिचय

    आधुनिक भारताच्या इतिहासाचा मागोवा दर्शवितो की पुणे विभागातील तत्कालीन सर्वच प्रांतानी मराठा स्वराज्याच्या लढ्यामध्ये आणि स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये वेळोवेळी मोलाचे योगदान दिलेले आहे. ही भूमी देशात ज्यांची थोरवी गायली जाते अशा अनेक थोर संत, समाज सुधारक, क्रांतिकारी, सुधारणावादी यांची जन्मभूमी व कर्मभूमी राहिलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व कालावधीतील सुरू झालेला पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव हा स्वातंत्र्य चळवळीमध्ये लोकांना एकत्रित आणण्यात महत्त्वाचा ठरलेला होता. स्वातंत्र्योत्तर कालावधीतही सहकार, सिंचन आणि शिक्षण चळवळीने कायापालट घडवून आणण्याचे कार्य पुणे विभागात झालेले आहे.

    पुणे विभागात ऐतिहासिक वारसा असलेली अनेक पुरातन स्थळे, धार्मिक तीर्थक्षेत्रे, मराठा साम्राज्याची दैदीप्यमान कारकीर्द सांगणारी अनेक ठिकाणे, शाही वैभवाच्या खाणाखुणा असणाऱ्या अनेक वास्तू तसेच प्राचीन गड किल्ले आजही सुस्थितीत जतन केल्याचे आढळून येतात.
    पुणे विभागाचा पश्चिमेकडील भाग हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. सह्याद्रीचा अभेद्य कडा हा अनेक पवित्र नद्यांचे उगम स्थान आहे. वृक्षसंपदा, प्राणी संपदा व पक्षी संपदा यामध्ये विविधता असणारा निसर्गाचा अनमोल ठेवा विशेषतः पुणे, सातारा व कोल्हापूर या तीन जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये आढळून येतो.
    केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील अनेक भक्तांचे श्रद्धास्थान असणारी अनेक तीर्थक्षेत्रे पुणे विभागामध्ये आहेत. महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा देवस्थान जेजुरी, श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग, खेड, श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर, श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, श्री ज्योतिबा देवस्थान पन्हाळा ही तीर्थक्षेत्रे पिढ्यानपिढ्या भाविकांची श्रद्धेची स्थाने आहेत.

    तसेच पंचगंगा मंदिर महाबळेश्वर, श्री शिखर शिंगणापूर मंदिर शिंगणापूर, श्री क्षेत्र माहुली संगम सातारा, श्री खंडोबा देवस्थान पाल, श्री दत्तस्थान औदुंबर, श्री दत्तस्थान नरसिंहवाडी, श्री गगनगिरी महाराज मठ गगनबावडा, श्री सिद्धेश्वर देवस्थान सोलापूर, श्री स्वामी समर्थ देवस्थान मंदिर अक्कलकोट, श्री कोपेश्वर मंदिर खिद्रापूर, श्री संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान देहू, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी स्थान आळंदी, श्री सोपान काका समाधी स्थान सासवड, श्री नीरा नरसिंहपुर देवस्थान इंदापूर यासारखे महत्त्वाची तीर्थक्षेत्र सुद्धा पुणे विभागात येतात.
    श्री मयुरेश्वर गणपती मोरगाव, श्री चिंतामणी गणपती थेऊर, श्री महागणपती रांजणगाव, श्री वरदविनायक गणपती ओझर व श्री गिरिजात्मज गणपती लेण्याद्री या अष्टविनायकातील पाच गणपतींची स्थाने पुणे विभागात आहेत.

    पुणे विभागात ऐतिहासिक वारसा असणाऱ्या अनेक वस्तू आजही दिमाखात उभ्या असलेल्या दिसतात. यामध्ये प्रामुख्याने शनिवार वाडा पुणे, लाल महाल पुणे, आगाखान पॅलेस पुणे, ओहेल डेविड सिनेगॉग पुणे, न्यू शालिनी पॅलेस कोल्हापूर, शाहू पॅलेस कोल्हापूर, सांगली पॅलेस सांगली यासारख्या अनेक भव्य वास्तूंचा समावेश होतो. भारतातले अनेक स्वातंत्र्य सेनानी यांना जिथे स्थानबद्ध करणेत आले त्या बराकी / खोल्या आजही येरवडा कारागृह पुणे येथे जतन केल्या आहेत.

    महाराष्ट्राचे गौरवशाली इतिहासाचे भाग असणारे अनेक गड किल्ले हे पुणे विभागात जास्त संख्येने आढळून येतात. यामध्ये प्रामुख्याने शिवनेरी, पुरंदर, तोरणा, सिंहगड, राजगड, लोहगड, अजिंक्यतारा, सज्जनगड, प्रतापगड ,वासोटा, मच्छिंद्रगड, प्रचितगड, भुईकोट किल्ला सोलापूर, विशाळगड, पन्हाळा, वैराटगड या व यासारख्या अनेक गड-किल्ल्यांचा समावेश होतो.

    निसर्गाचे वरदहस्त असणाऱ्या या पुणे विभागामध्ये भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य, भिगवण पक्षी अभयारण्य, कोयना वन्यजीव अभयारण्य, सागरेश्वर अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान, राधानगरी वन्यजीव अभयारण्य या महत्वाच्या अभयारण्याचा समावेश होतो. या जंगलात प्रामुख्याने महाराष्ट्राचा वन्यप्राणी शेकरू, गवा, वाघ, हरीण, हत्ती, सांबर, बिबटया, काळवीट तसेच विविध प्रकारची वृक्षसंपदा व अनेक प्रकारचे पक्षी आढळुन येतात. कार्ला, भाजे, लेण्याद्री, पाताळेश्वर, आगाशिव या ठिकाणी जुन्या काळातील लेण्या, शिरूर येथील रांजण खळगे, मस्तानी तलाव वडकी, शिंदे छत्री वानवडी हे पर्यटनाचा भाग आहेत.

    इतिहासकालीन घटनांचे साक्षीदार असणारे अनेक लेख, हस्तलिखिते, मूर्ती, वस्त्रे, भांडी,शस्त्रे या व अशा अनेक वस्तू राजा दिनकर केळकर संग्रहालय, महात्मा फुले संग्रहालय, दर्शन संग्रहालय या ठिकाणी जतन करण्यात आलेल्या आहेत.

    सह्याद्रीच्या रांगेमध्ये अनेक महत्त्वाच्या नद्यांचा उगम होतो. पुणे विभागामध्ये भीमा, इंद्रायणी, मुळा, मुठा ,नीरा, कोयना, कृष्णा, वारणा, पंचगंगा या नद्यांची आणि त्यांचे उपनद्यांची खोरी असून उजनी धरण, वीर धरण, भाटघर धरण, खडकवासला धरण, पानशेत धरण, धोम धरण, चांदोली धरण, राधानगरी धरण अशी अनेक महत्त्वपूर्ण धरणे सिंचना साठी महत्वाची आहेत. तसेच कोयना प्रकल्पाद्वारे महाराष्ट्र राज्यातील बहुतांश भागास वीजपुरवठा केला जातो. लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, पाचगणी, गगनबावडा ही ठिकाणे थंड हवेची ठिकाणे म्हणून पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच कास पठार सातारा हे दुर्मिळ अशा सुंदर रानफुलांच्या प्रजातींसाठी प्रसिद्ध आहे. कास पठाराला महाराष्ट्राची व्हॅली ऑफ फ्लावर्स असेही म्हटले जाते.
    पुणे विभागामध्ये तांदूळ, बाजरी, गहू, ऊस, मका, हरभरा, शेंगदाणे, ज्वारी, सोयाबीन, हळद ही महत्त्वाची पिके असून केळी, आंबा, पेरू, द्राक्ष, डाळिंब या फळांच्या उत्पन्नात व फुल शेतीतही पुणे विभाग अग्रेसर आहे.

    उच्च शिक्षणाच्या सुविधा, व्यापार, दळणवळण, अर्थाजनाच्या व संशोधनाच्या अनेक संधी यामध्ये विभाग कायमच अग्रेसर राहिलेला आहे. चांदीचे दागिने व त्यावरील कलाकुसर, कोल्हापुरी चपला, साखर, गुळ, घोंगड्या, बेदाणे, हळद, हातमाग यासारख्या अनेक वस्तूंच्या निर्मितीमध्ये विभाग अग्रेसर असून अनेक उत्पादने परदेशातही निर्यात केली जातात.

    पुणे विभागामध्ये केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या एकूण 22 विविध संस्था कार्यरत आहेत. यामध्ये संशोधन संस्था, प्रयोगशाळा, निर्मिती प्रकल्प तसेच संरक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या अनेक प्रमुख कार्यालयांचा समावेश आहे. सैन्य दलाचे दक्षिण मुख्यालय पुणे येथे कार्यरत असून त्याचबरोबर राष्ट्रीय संरक्षण अकादमी, सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय, सेना अभियांत्रिकी महाविद्यालय यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या संस्थां विभागात कार्यरत आहेत. तसेच पुणे विभागात महाराष्ट्र शासनाच्या अनेक विभागांची आयुक्तालये आहेत.

    पुणे विभागामध्ये एकुण 56 औद्योगिक व महिती तंत्रज्ञान क्षेत्रे विकसित करण्यात आली असून अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. त्याचबरोबर खराडी, हिंजवडी, तळवडे येथे माहिती तंत्रज्ञानाविषयी उभारलेली माहिती तंत्रज्ञान केंद्रे देश स्तरावर सुद्धा नावाजलेली आहेत.

    महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासामुळे असलेली पारंपारिकता व काळानुसार आलेली आधुनिकता या दोन्हीचा अनोखा संगम पुणे भागातील अनेक गाव व शहरे यामध्ये दिसून येतो. शासनाचे विविध प्रकल्प पुणे विभागांमध्ये राबवले गेले आहेत. पुणे विभाग हा महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रामध्ये, संशोधन क्षेत्रामध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये आणि विकासामध्ये महत्त्वाची भूमिका कायमच बजावत आहे.

    पुणे विधान भवनाचे ऐतिहासिक महत्व

    • छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि प्राचीन काळापासून ऐतिहासिक परंपरा असलेल्या वैभवशाली पुणे शहराच्या इतिहासात भर घालणारी एक ऐतिहासिक वास्तू म्हणजे पुण्याचे ‘विधान भवन’ होय. १८७० मध्ये बांधलेली ही वास्तू अनेक घटनांची साक्षीदार आहे.

    • सदर विधानभवन इमारतीचे बांधकाम हे ब्रिटीश कालीन दगडी व वीटबांधकामामध्ये सन 1870 साली पूर्ण झालेले आहे. विधानभवन इमारतीतील तळमजल्याचे व पहिल्या मजल्याचे प्रत्येकी क्षेत्रफळ १२५८.०१ चौरस मीटर इतके असून एकूण क्षेत्रफळ २५१६.० चौ. मी. इतके आहे. तसेच विधानभवन परिसराचे एकुण क्षेत्रफळ ८ एकर परिसरामध्ये विस्तारलेले आहे.

    • या मुख्य इमारतीत तळमजल्यावरील बैठकीचे (मिटींग हॉल) दालन १० मीटर उंचीचे आहे. या मिटींग हॉलचे आतील छत (सिलिंग) लाकुडकामामध्ये केलेले असून पूर्ण विधानभवन इमारतीचे छत जी.आय. पत्रा व त्यावर लाकूड काम करुन मंगलोरी कौलाचे आहे.

    • १९३५ च्या भारत सरकार कायदयाच्या आधारे (Govt. of India Act, १९३५) मुंबई प्रांतात प्रथमच विधानसभा स्थापन झाली. त्या आधी १८६२ पासून लेजिस्लेटिव्ह कौन्सिल अस्तित्वात होती. परंतु लोकशाहीच्या तत्वानूसार लोकप्रतिनिधींना त्यात सत्ताधिकार हवे होते. १९३५ च्या कायद्यानूसार सार्वत्रिक निवडणूकीव्दारे लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार मिळाला होता. या इमारतीमध्ये विधानसभेचे पहिले अधिवेशन १९ जुलै १९३७ रोजी घेण्यात आले होते.

    • अध्यक्ष यांची निवड :- विधानसभेच्या अध्यक्षांची तसेच उपाध्यक्षांची निवड २१ जुलै १९३७ ला झाली. श्री. गणेश वासुदेव मावळंकर आणि श्री. नारायण गुरुराव जोशी हे दोघे अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून अविरोध निवडून आले. श्री. दादासाहेब मावळंकर हे पुढे लोकसभेचे अध्यक्ष झाले. श्री.मावळंकर अध्यक्षपदावर स्थानापन्न झाल्यावर, त्या दिवसाचे पुढील कामकाज सुरु करण्यापुर्वी ‘वंदे मातरम्’ गाण्यात यावे अशी इच्छा सदस्यांनी प्रकट केली व त्याप्रमाणे सर्व सदस्यांना उभे राहण्याची विनंती केली. सर्व सदस्य उभे राहिले व ‘वंदे मातरम्’ गंभीर वातावरणात गाण्यात आले. स्वातंत्र्याच्या ऊर्मीचा हा विलोभनीय आविष्कार ज्यांनी प्रत्यक्ष पाहिला असे ते खरोखरच धन्य होत.

    • राज्यघटना समितीची स्थापना करणारा ठराव :- बाळासाहेब खेर यांनी भारतीयांना स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आणि राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समिती स्थापना करण्याचा पहिला ऐतिहासिक ठराव २१ सप्टेंबर १९३७ रोजी मांडला व तो एकमताने संमत करण्यात आला. या ठरावाला भारतीय राज्यघटनेच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे.

    • स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे पहिले अधिवेशन :- स्वातंत्र्य मिळाल्यावर पहिले अधिवेशन १० सप्टेंबर १९४७ रोजी पुण्याच्या कौन्सिल हॉलमध्ये सुरु झाले. सदस्यांना परत शपथ घ्यावी लागली, कारण पुर्वी घेतलेली शपथ ही इंग्लंडच्या राजाला तसेच भारताच्या बादशहाला उद्देशून होती व आता सर्वांनी स्वतंत्र भारताला उद्देशून शपथ घेतली.

    • पुणे विधान भवन वास्तू – ऐतिहासिक घटनांची साक्षीदार :- पुणे येथील विधान भवनात महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या ७५ वर्षांच्या कालावधीतील सन १९३७ ते १९५५ पर्यंत विधिमंडळाची एकुण १३ अधिवेशने झाली. त्यातील सन १९३८ मध्ये दिनांक १७ ऑगस्ट ते १७ नोव्हेंबर १९३८ पर्यंत चार महिने चाललेले अधिवेशन ६२ दिवसांचे झाले. त्यात ३६९ तास ४५ मिनिटे कामकाज झाले. एवढे प्रदीर्घ काळ चाललेले अधिवेशन हे विधानमंडळाच्या आजवरच्या इतिहासातील पहिलेच अधिवेशन आहे. पुणे येथील विधान भवनात झालेल्या अधिवेशनात अनेक विषयांवर चर्चा घडवून जनहिताचे अनेक निर्णय घेतले. महत्वाचे कायदे करण्यात आले.

    • पुणे विधान भवनामध्ये चर्चेला आलेली व पारीत झालेली प्रमुख विधेयके:-
      1. व्दिभार्या प्रतिबंधक कायदा , १९४६
      2. हरिजन मंदिर प्रवेश कायदा, १९४७
      3. कुळवहिवाट व शेतजमीन कायदा, १९४८
      4. खार-जमीनी कायदा, १९४८
      5. पुणे विद्यापीठ कायदा, १९४७
    • राष्ट्रीय लोकशाही परंपरेची विधानमंडळाची दोन्ही सभागृहे ही लोककल्याणाच्या व सर्वांगीण विकासाच्या कामात आघाडीवर राहिली आहेत. देशातील अव्वल दर्जाचे पुरोगामी, कार्यक्षम आणि लोकहिततत्पर असा राज्याचा लौकिक प्रस्थापित करण्यात या सभागृहांचा सिंहाचा वाटा आहे. या गौरवशाली इतिहासाची कृतज्ञतापूर्ण आठवण आणि प्रेरणा घेऊन लोकशाही परंपरेच्या मंगलस्मृतींना उजाळा मिळावा, नव समाज परिवर्तनाचे कार्य संसदीय पध्दतीने गतीमान व्हावे यासाठी दिनांक १७ फेब्रुवारी १९८९ रोजी विधिमंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त चर्चा सत्राचे आयोजन याच ठिकाणी केले होते.

    • पुण्याच्या विधान भवनाची ही वास्तु अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार बनली आहे. ज्या विधिमंडळाची सुरुवात १९३७ मध्ये या वास्तूमध्ये झाली, त्याच ठिकाणी विधिमंडळाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून दिनांक ९ नोव्हेंबर २०१२ रोजी परिसंवादाच्या माध्यमातून याच वास्तूच्या परिसरात विधानमंडळाच्या विद्यमान सदस्यांना उपस्थित राहण्याचा ऐतिहासिक योग प्राप्त झाला होता.