Close

    Pune Grand Tour

    Publish Date : January 13, 2026
    fb8c9eab-7d8d-42b9-8e8c-b728fd6de549

    ‘पुणे ग्रँड टूर’ यशस्वी करण्यासाठी प्रत्येक मार्गावर अचूक तयारी करावी- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

    पुणे, दि. १२ : ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये पोलीस, सार्वजनिक बांधकाम, पुणे व पिंपरी- चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, आरोग्य आदींची भूमिका महत्त्वाची आहे. स्पर्धा मार्गावर सर्व संबंधित विभागात योग्य समन्वय राहून स्पर्धा यशस्वी होईल यासाठी अचूक तयारी करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.

    जिल्ह्यात १९ ते २३ जानेवारी

    दरम्यान होणाऱ्या ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित सर्व विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा उप वनसंरक्षक महादेव मोहिते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, पुणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, पिंपरी चिंचवड शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त विवेक पाटील आदी तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे संबंधित उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

    विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, स्पर्धेसाठी बंदोबस्तासाठी मनुष्यबळाची कोणतीही कमतरता पडणार नाही याची खात्री करावी. स्पर्धेदरम्यान रस्त्यावर कोणीही येणार नाही याची खात्री करा. वाहतूक व्यवस्थापनासाठी महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग घ्यावा. रंगीत तालीम घेतल्यामुळे स्पर्धेचा ताफा सहजरित्या पुढे जात राहील, सर्व विभागातील समन्वय, संपर्क यंत्रणा कशी आहे हे लक्षात येते. त्यामुळे स्पर्धेच्या प्रारंभ ठिकाणापासून शेवटच्या ठिकाणापर्यंत अचूक रंगीत तालीम करावी व लक्षात येणाऱ्या त्रुटी काढून टाकाव्यात.

    स्पर्धा मार्गावर सायकलिस्ट फेडरेशन ऑफ इंडियाच्या (सीएफआय) सूचनेप्रमाणे सूचना चिन्हे (सायनेजेस) लावण्याची कार्यवाही पूर्ण करावी. रंगकाम तसेच इतर सौंदर्यीकरणाचे काम दोन्ही महानगरपालिका, पीएमआरडीए आदींनी पूर्ण करावे. मनपा, पीएमआरडीए तसेच जिल्हा परिषदेने आपल्या हद्दीतील स्पर्धा मार्गावर एकही अनधिकृत होर्डिंग असणार नाही, लोंबत्या केबल्स काढले जातील, उघडे चेंबर्स असणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा असल्याने स्पर्धा कालावधीत कोणीही रस्त्यावर येऊ नये अशी घोषणा यापुढे वारंवार स्पर्धा मार्गावर करण्यात यावी, आदी निर्देश त्यांनी दिले.

    जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित मनपा, पीएमआरडीए यांनी रस्त्याच्या ठराविक अंतरासाठी अभियंता, कंत्राटदाराची नेमणूक करावी. स्पर्धेच्या अगोदरच्या दिवशी संपूर्ण स्पर्धामार्गाची स्वच्छता करावी. मार्गावर एकही धोकादायक विजेची वाहिनी, केबल असणार नाही, असल्यास बदलण्यात येईल याची खात्री महावितरणने करावी.

    मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील म्हणाले, स्पर्धेदरम्यान मार्गावर कुत्रे तसेच ग्रामीण भागात पाळीव जनावरे येऊ नयेत यासाठी उपाययोजना कराव्यात. महावितरणने स्पर्धा मार्गावरील धोकादायक विजेच्या वाहिन्या, केबल्स बदलाव्यात व सुरक्षिततेची खात्री करावी.

    बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए यांनी आपल्या तयारीच्या अनुषंगाने सादरीकरण केले.