Close

    Graduate nad Teachers Constituency Final Electoral Roll

    Publish Date : January 13, 2026
    a93ffc27-d8d6-4525-b328-6b110b44f2d0

    पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध

    *तीन लाख ११ हजार पदवीधरांची व ५२ हजार शिक्षकांची नावनोंदणी*

    पुणे, दि.१२: विभागातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या नव्याने मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत विभागीय आयुक्त तथा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते आज अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. या यादीनुसार पुणे विभागात ३ लाख १० हजार ९६४ पदवीधर तर ५१ हजार ९७९ शिक्षक मतदार आहेत. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असली तरी मतदार नोंदणी निरंतर सुरू राहणार असल्याने पात्र पदवीधर व शिक्षकांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहनही डॉ.पुलकुंडवार यांनी केले.

    विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास अपर आयुक्त तुषार ठोंबरे, पुणे जिल्ह्याच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदींसह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    मतदार यादी तयार करण्याच्या २०२५ च्या कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादीत पदवीधर मतदार संघासाठी पुणे जिल्ह्यात ६१ हजार ११३ मतदार, सोलापूर- ३८ हजार २२, सातारा- ४२ हजार ६३, सांगली- ७८ हजार ३६६, कोल्हापूर- ९१ हजार ४०० अशी एकूण ३ लाख १० हजार ९६४ इतकी नोंदणी झाली आहे. तर शिक्षक मतदार संघासाठी पुणे- १२ हजार १८७, सोलापूर- १३ हजार १५८, सातारा- ९ हजार ९७, सांगली- ७ हजार ३२२, कोल्हापूर- १० हजार २१५ अशी एकूण ५१ हजार ९७९ इतकी नोंदणी झाली आहे.

    प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांना देण्यात आल्या. तसेच या याद्या विभागीय आयुक्तालयाच्या तसेच संबंधित जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहेत. २०२० मध्ये पदवीधर मतदार संघासाठी ४ लाख २० हजार ८६ इतकी तर शिक्षक मतदारांची ७२ हजार १९० इतकी नोंदणी होती. गेल्या निवडणुकीपेक्षा अंतिम मतदार यादीत कमी मतदार नोंदणी दिसत असली तरी मतदार नोंदणी निवडणूक प्रक्रिया जाहीर होईपर्यंत निरंतर सुरू राहणार असल्याने मतदारांच्या अंतिम संख्येमध्ये मोठी वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करून त्यासाठी राजकीय पक्षांनी नागरिकांमध्ये मतदार नोंदणीबाबत जनजागृती करावी, असे आवाहनही विभागीय आयुक्तांनी केले.

    *मतदार नोंदणीची प्रक्रिया निरंतर सुरू राहणार*

    मतदार संघांच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत नवीन नाव नोंदणीचा दावा, आक्षेप दाखल करता येईल. नवीन नाव नोंदणीसाठी पात्र पदवीधरांना नमुना क्रमांक १८ व शिक्षकांना नमुना क्रमांक १९ द्वारे दावा दाखल करता येईल. नावांबाबत आक्षेप असल्यास नमुना क्रमांक ७ व नोंदीमध्ये दुरुस्तीसाठी नमुना क्रमांक ८ दाखल करता येईल, असेही विभागीय आयुक्तांनी सांगितले.